Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम यांची...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम यांची कारागृह पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड.आई-वडिलांच्या छत्रछायेशिवाय संघर्षमय प्रवास; शिक्षणासाठी मुनगंटीवार ठरले आधारवड.एका शिफारस पत्राने उघडला शिक्षणाचा मार्ग; आज खुशालने गाठले यशाचे शिखर.

चंद्रपूर – मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नागपूर येथील कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदापर्यंत मजल मारली असून या यशामागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना खुशाल यांनी व्यक्त केली आहे.

खुशाल गेडाम यांचे वडील सुरेश गेडाम यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, २०१४ मध्ये आईचेही निधन झाले. त्या वेळी खुशाल केवळ ९ वर्षांचा होता. आई-वडिलांच्या निधनामुळे त्याच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र शिक्षण घेण्याची जिद्द त्याने कधीही सोडली नाही.

मोठ्या कष्टाने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. आर्थिक अडचणींमुळे बी.ए.चे शिक्षण घेणे कठीण झाले होते. अशा वेळी त्याने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मदतीची याचना केली. खुशालची परिस्थिती लक्षात घेत आ. मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेत सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र देऊन सिंदेवाही येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात त्याला प्रवेश मिळवून दिला. या एका निर्णयामुळे खुशालच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि त्याने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खुशालने पोलीस दलात भरती होण्याचा निर्धार केला. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत त्याने सातत्याने मेहनत घेतली. त्याच्या अथक परिश्रमांना अखेर यश मिळाले आणि नागपूर येथे त्याची कारागृह पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली.

या यशानंतर खुशाल गेडाम यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आई-वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारमय झाले होते. मात्र शिक्षणासाठी मिळालेल्या मदतीमुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. आज मी पोलीस दलात दाखल होऊ शकलो, यामागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

खुशाल गेडाम यांच्या यशामुळे गोलाभुज गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनीही आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. एका पत्रामुळे आणि योग्य वेळी केलेल्या सहकार्यामुळे सामान्य कुटुंबातील, अनाथ झालेल्या मुलाला उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर शासकीय सेवेत स्थान मिळविले. समाजकारण म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनणे असते, याची प्रचिती खुशाल गेडाम यांच्या यशोगाथेतून पुन्हा एकदा आली आहे.

SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular