Wednesday, June 3, 2026
Google search engine
HomePoliticalविदर्भस्तरीय “आमदार श्री” बॉडीबिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा योगेश शेंडे ठरला “आमदार श्री २०२६”...

विदर्भस्तरीय “आमदार श्री” बॉडीबिल्डिंग स्पर्धेत नागपूरचा योगेश शेंडे ठरला “आमदार श्री २०२६” चा मानकरी

आमदार किशोर जोरगेवार यांची संकल्पना; १२३ स्पर्धकांचा सहभाग

sampadak

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेली विदर्भस्तरीय “आमदार श्री” बॉडीबिल्डिंग स्पर्धा २०२६ रविवारी सायंकाळी मनपा पटांगण, गांधी चौक येथे उत्साहात पार पडली.
विदर्भातील विविध जिल्ह्यांतील १२३ नामांकित बॉडीबिल्डर्सनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या दमदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन केले. पार पडलेल्या या स्पर्धेत नागपूरचा योगेश शेंडे यांनी “आमदार श्री २०२६” हा किताब पटकावला.रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेला क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर हरमीत सिंह यांची उपस्थिती हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, क्रीडा क्षेत्र हे तरुणाईला योग्य दिशा देणारे आणि निरोगी समाज घडविणारे प्रभावी माध्यम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात तरुणांनी शरीरसौष्ठव आणि फिटनेसकडे वळणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी आणि त्यांना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेत विविध वजनगटांनुसार खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये ५५ किलो गटात भंडारा जिल्ह्यातील आयुष बेंद्रे, ६० किलो गटात नागपूर येथील राहुल बागडे, ६५ किलो गटात नागपूर येथील गिरीराज काळे, ७० किलो गटात अकोल्यातील शेख सलीम शेख कलीम, ७५ किलो गटात नागपूर येथील श्रावण बावणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर ओपन गटात नागपूर येथील योगेश शेंडे विजयी ठरले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किताब असलेला “आमदार श्री २०२६” हा मान योगेश शेंडे यांनी पटकावला. याशिवाय बेस्ट पोझर हा किताब नागपूर येथील गिरीराज काळे यांना, तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट पुरस्कार नागपूर येथील राहुल बागडे यांना प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचे पंच म्हणून अविनाश लोखंडे, अभिषेक कारिंगवर,राजू कोतेवार, विशाल शिंदे, प्रीतम पाटील, टिकू शिंदे, नितीन गावंडे, किशोर आदमने यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली याशिवाय विवेक बुरडकर, नकुल वासमवार आणि सुभाष लांजेकर यांनी विशेष सहकार्य केले.
विदर्भातील नामांकित बॉडीबिल्डर्सच्या सहभागामुळे ही स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. या प्रसंगी सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

recent News

Most Popular