
मुख्य संपादक– योगिता पाटेकर मो. 9604343287 SP India news
आगामी 27 मे 2026 रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद सण साजरा होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सर्व समाजघटकांमध्ये धार्मिक सलोखा व शांतता कायम राहावी या उद्देशाने आज पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे जिल्हा शांतता समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.

सदर बैठक पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीला जिल्ह्यातील विविध मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
बकरी ईदचा सण सर्वांनी अत्यंत उत्साहात, शांततेत आणि सर्वधर्मसमभावाच्या भावनेने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजकंटकांना थारा देऊ नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. कुर्बानीच्या वेळी शासनाने आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही आणि स्वच्छतेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारी कोणतीही पोस्ट, मेसेज अथवा व्हिडिओ टाकू नये. पोलीस सायबर सेलचे यावर बारीक लक्ष असून अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. सणाच्या दिवशी शहरात आणि जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
वर्धा जिल्ह्याला नेहमीच शांतता आणि सलोख्याची मोठी परंपरा लाभलेली आहे. आगामी बकरी ईद सण देखील सर्वांनी एकत्रित येऊन, एकमेकांच्या भावनांचा आदर करत शांततेत साजरा करावा. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे.
*(आशिष चिलांगे)*
सहायक जनसंपर्क अधिकारी,
पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा
SP India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


